अचूक शेती
कृषी क्षेत्रात सुदूर संवेदन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तपशीलवार माहितीसह डिजिटल गाव नकाशांचा एक संच तयार करत आहोत. हे नकाशे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राने (एमआरएसएसी) डिजीटाइझ केलेल्या शासकीय नकाशांवर आधारित आहेत. या नकाशातील सर्व्हे नंबर निहाय माहिती लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांना प्रत्येक शेतासाठी योग्य शेती सल्ला देण्यासाठी उपयुक्त ठरते. अचूक शेतीचा सल्ला “क्रॉपटेक प्रो” या खास याच कामासाठी विकसित केलेल्या मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना दिला जातो. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांसाठी सेवा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्तच आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्तेजन देण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमीनीचे विभाजन झाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांतून मार्ग काढणे. मात्र प्रभावी आणि उपयुक्त साधनांच्या अभावी आजही शेतकरी उत्पादक कंपन्या भागधारकांचे व्यवस्थापन, उत्पादनाचे नियोजन, निविष्ठा उपलब्ध करून देणे आणि शेतमालाचे एकत्रीकरण प्रभावीपणे करू शकत नाहीत. आम्ही त्यासाठी एक एकात्मिक पोर्टल “e-FPC” तयार करत आहोत ज्यामध्ये मोबाईल अॅप, सुदूर संवेदन आणि जीआयएस यासारख्या तंत्रांचा वापर केला जातो.
क्रॉपटेक प्रो:अचूक आणि स्वयंचलित शेतीसाठी सल्ला सेवा
शेतकऱ्यांना अचूक उत्पादन पद्धती अवलंबण्यासाठी मार्गदर्शन करणारी ही सेवा प्रत्येक शेताची वैशिष्ट्ये आणि स्थानिक आकडेवारीचा वापर करते. सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली, आयओटी उपकरणे यांसारख्या साधनांच्या वापराद्वारे आम्ही विकसित केलेली निर्णय समर्थन प्रणाली वापरून शाश्वत उत्पादनास प्रोत्साहन देणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. अचूक शेती ही संबंधित माहितीचा वापर करून अचूक आणि वेळेवर निर्णय घेण्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, जमिनीचा प्रकार, मातीची खोली आणि पर्जन्यमानावर वाणाची निवड अवलंबून असते. एकदा या बाबी ज्ञात झाल्यानंतर, अॅपमध्ये असलेली निर्णय समर्थन प्रणाली योग्य वाणांची एक छोटी यादी तयार करते. अशाच प्रणाली पेरणीचे अंतर, खतांच्या अचूक मात्रा, किडींची ओळख आणि व्यवस्थापन, तण नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन आणि काढणी व्यवस्थापन यासाठी दिलेले आहेत. “क्रॉपटेक प्रो” अॅप प्रत्येक शेतावर अचूक शेती करण्यास मदत करण्यासाठी तयार केलेले आहे. उपग्रह प्रतिमेचा वापर करून शेताचे भौगोलिक स्थान नोंदणीकृत केले जाते. शेतातील बारीकसारीक तपशील जसे की मातीचा प्रकार आणि सुपीकता, वापरलेल्या बाह्य निविष्ठा, सिंचनाची उपलब्धता इत्यादि नोंदवला जातो. या तपशीलाचा वापर करून, अॅप शेतकऱ्याला पीक चक्राच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते. निविष्ठांच्या तर्कशुद्ध आणि योग्य प्रमाणात वापरामुळे शेती शाश्वत होण्यास मदत होते. हे अॅप अशा प्रकारे खिशात स्मार्टफोन घेऊन बसलेल्या शेतकऱ्याचा डिजिटल वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करते. तणाव, पोषक तत्वांची कमतरता, कीड आणि रोगांचे आक्रमण इत्यादी ओळखण्यासाठी शेतकरी छायाचित्रे अपलोड करू शकतात. अचूक आणि वेळेवर ओळख केल्याने योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य उपाययोजना अवलंबता येतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांसारख्या सारख्या शेतकरी समूहांना त्यांच्या सदस्यांशी संबंधित माहितीचा खूप फायदा होऊ शकतो ज्यामुळे त्यांचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यात मदत होते.
ई-एफपीसी:एफपीसी डिजिटायझेशन
ही सेवा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे डिजिटायझेशन करायला मदत करते. याचे दोन मुख्य विभाग आहेत, ज्यापैकी एक कायदेशीर अनुपालन आणि दुसरा व्यावसायिक कामकाजाशी संबंधित आहे. कोणत्याही शेतकरी उत्पादक कंपनीचा आकार सहसा सदस्य संख्येत मोजला जातो. तथापि, मुख्य पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र हेच खरे महत्वाचे आहे. सदस्यत्व मोजणे सोपे आहे, परंतु जमिनीच्या प्रोफाइलपासून ते पीक तपशीलापर्यंत सर्व माहितीसह लागवडीखालील क्षेत्र मोजणे हे हाताने केले तर कठीण काम आहे. त्यामुळे सिमेंटिक अॅग्रीटेकने भौगोलिक माहिती प्रणाली वापरून सर्व सदस्यांच्या शेतांचे डिजिटायझेशन करण्याची प्रणाली तयार केली आहे. एकदा डिजिटायझेशन झाल्यावर, एफपीसी स्तरावर शेती आणि अनुषंगिक माहिती एकत्रित करणे तुलनेने सोपे आणि अत्यंत उपयुक्त ठरते. जेव्हा सर्व शेतकरी सभासद त्यांच्या शेताचे स्थान नोंदवतात तेव्हा पीक क्षेत्राची पडताळणी करण्यासाठी, पीक आरोग्याचे विश्लेषण करण्यासाठी, कीड-रोगग्रस्त क्षेत्रे आणि पाण्याचा ताण इत्यादी तपासण्यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर सहज करता येईल. कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या संपूर्ण कार्यक्षेत्राचे विहंगम दृश्य मिळेल. डॅशबोर्डवर ते निविष्ठांच्या गरजा, उत्पादन अंदाज इत्यादींवरील अहवाल तयार करू शकतात. एकाच वेळी भौगोलिक माहिती प्रणाली वापरून कंपनीच्या संपूर्ण कार्यक्षेत्राचे विश्लेषण केल्याने बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादींची एकत्रित गरज निश्चित करून मोठ्या प्रमाणात आगाऊ खरेदी करण्यास मदत होऊ शकते. व्यवस्थापन एखाद्या विशिष्ट पीक किंवा जातीच्या अंतर्गत पेरलेल्या क्षेत्राचे सहजपणे निरीक्षण करू शकते आणि अंदाजे उत्पन्न वापरून, विक्री किंवा गोदामांद्वारे पुढील विल्हेवाटीसाठी शेतमालाचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्पादनाच्या एकत्रीकरणाचे नियोजन करू शकते.
बाजार जोडणी आणि ट्रेसेबिलिटी सोल्यूशन्स
क्रॉपटेक प्रो अॅपमध्ये भौगोलिक स्थान वापरून शेताच्या सीमांची नोंदणी करण्याचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. शेताचा सर्व तपशिल या स्थानाशी जोडलेला आहे. भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे उपग्रह प्रतिमा वापरून सर्व नोंदणीकृत शेतांची पाहणी करता येते. उदाहरणार्थ, जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व सदस्य या प्रणालीवर नोंदणीकृत असतात, तेव्हा कोणीही विशिष्ट प्रकारची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि यादी, त्यांच्या वास्तविक पेरणीची तारीख आणि/किंवा अपेक्षित कापणी तारखेवर आधारित शेतकऱ्यांचे गट, उत्पादनाचा अंदाज इत्यादी माहिती काढू शकतो. ही सर्व माहिती खरेदीदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे, विशेषत: ज्यांना शोधण्यायोग्यता (ट्रेसेबिलीटी) आवश्यक आहे. आमची “ई-एफपीसी” सेवा शेतकरी आणि एफपीसी यांना शेतमाल विक्रीसाठी ग्राहक शोधण्याची सुविधा प्रदान करते आणि खरेदीदार त्यांची मागणी ऑनलाइन देखील करू शकतात. यामुळे ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी/विक्री व्यवहार सुलभ होईल. जमीन तयार करण्यापासून ते पेरणीपर्यंत प्रत्येक शेताचे निरीक्षण केले जात असल्याने, खरेदीदार विशिष्ट जाती किंवा विशिष्ट उत्पादन पद्धतींचा अवलंब करणारे शेतकरी वेगळे करू शकतात आणि त्यांच्या गरजेनुसार उत्पादनाचा खात्रीशीर पुरवठा मिळविण्यासाठी त्यांची मागणी थेट किंवा FPC द्वारे करू शकतात. हे अॅप विशिष्ट निविष्ठा, विशेषत: कीटकनाशके, उत्पादन पद्धती, कापणी व्यवस्थापन आणि काढणीनंतरच्या पद्धती सहज आणि प्रभावीपणे वापरण्याशी संबंधित सल्ला सुलभतेने प्रसारित करू शकते. ही तंत्रज्ञान आधारित प्रणाली शेतकरी आणि खरेदीदारांना अन्न सुरक्षा, शोधण्यायोग्यता, गुणवत्ता आणि सतत उपलब्धता यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी थेट जोडणी उपलब्ध करून देते.
माती परीक्षण
अचूक शेतीसाठी माती परीक्षण ही मूलभूत गरज आहे. शेत स्तरावर योग्य सल्ला सेवांसह माती परीक्षणाच्या सुविधा अधिक सुलभ करणे आवश्यक आहे. सिमेंटीक त्यांच्या कार्यक्षेत्रातील चांगल्या प्रयोगशाळांसोबत सहकार्य करत आहे तसेच ग्रामीण तरुणांना आमच्या स्वतःच्या प्रयोगशाळेद्वारे माती परीक्षण सेवा देण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. यामुळे शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण होईल आणि शाश्वत अचूक शेतीला चालना मिळेल ज्यामुळे खतांचा तर्कसंगत वापर होईल आणि सरासरी उत्पादनात वाढ होईल.
सर्वेक्षण आणि फवारणीसाठी ड्रोन
ड्रोनचा वापर सर्वेक्षणासाठी तसेच फवारणीसाठी वाहन म्हणून केला जाऊ शकतो. नॅनो युरिया सारख्या पोषक तत्वांची फवारणी आणि योग्य शिफारसी उपलब्ध असतील तर कीटकनाशकांची फवारणी यामध्ये ग्रामीण रोजगार निर्मितीची अफाट क्षमता आहे. ड्रोनच्या सहाय्याने पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सेवा सरकार तसेच खाजगी संस्थांना आवश्यक असतात. यामध्ये, डेटा प्रोसेसिंग हे एक तांत्रिक काम आहे, जे सिमेंटिकद्वारे हाताळले जाते तर ग्रामीण तरुणांना डेटा गोळा करण्यासाठी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
आमच्या सेवा अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण आहेत:-
1. लहान शेतकऱ्यांसाठी अचूक शेतीचा सल्ला -
आमची उत्पादने, “क्रॉपटेक प्रो” तसेच “ई-एफपीसी” कमीत कमी 1 हेक्टर शेती असलेल्या लहान शेतकऱ्यांना अचूक शेती सल्ला सेवा देतात. प्रत्येक शेतातील मातीच्या गुणधर्मांनुसार योग्य वाण, पेरणीचे अंतर आणि खतांची मात्रा सुचवण्यासाठी निर्णय समर्थन प्रणाली वापरली जाते. अशा शेत पातळी सानुकूलित सेवा बाजारातील इतर कोणत्याही सेवा प्रदात्याद्वारे प्रदान केल्या जात नाहीत.
2. जास्त उत्पादन पण कमी मूल्याची नगदी पिके –
सिमेंटिक ऍग्रीटेकने कापूस आणि सोयाबीनची मुख्य पिके म्हणून निवड केली आहे. सामान्यतः उच्च मूल्याच्या व्यावसायिक पिकांमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या वापराचा विचार केला जातो, त्याच्या विपरीत ही निवड आहे. या पिकांमध्ये मोठ्या संख्येने लहान शेतकऱ्यांचा सहभाग आणि तंत्रज्ञानाचा अवलंब कमी असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अचूक शेती सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.
3. लहान शेतांसाठी उपग्रह प्रतिमा आणि GIS चा वापर -
आत्तापर्यंत, तालुका, जिल्हा, नदी खोरे किंवा राज्य यासारख्या मोठ्या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर केला जात असे. सिमेंटीक मात्र लहान शेतकऱ्यांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुलभ करण्याच्या मोहिमेवर आहे. आम्ही यासाठी जियोक्लेडीयन (GeoCladian) या जर्मन तंत्रज्ञान कंपनीशी सहकार्य केले आहे.
4. थेट शेतावर सेवा -
सिमेंटिकने या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक तालुक्यात “कृषी मित्र” नियुक्त केला आहे. हे प्रशिक्षित स्थानिक युवक अॅपच्या वापरास मदत करण्यासाठी आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात असतात.